Saturday, April 14, 2007

.. मन करा रे प्रसन्न

.... रात्री गाडीला किक मारावी , हायवेला फार गर्दी नसावी आणि अशा परिस्थितीत आपली बाइक रस्त्याची एक बाजु पकडुन ५० च्या वेगाने चालवायची यात एक सुख आहे. तसेच पुढे जाउन आपण मग हमरस्ता सोडतो आणि आडवाटेने जायला लागतो. गाडीला धाप लागेल असा एक घाट लागतो. त्या घाटाच्या चढाच्या टोकावर एक शंकराचे मंदीर असते. आपण गाड्या कडेला घेतो. पौर्णीमा येउ घातलेली असते. त्यामुळे चंद्र आणि चांदण्या ताजातवान्या भासतात.
एव्हाना आपण ऑफिसमधील कामाचा ताण , घराच्या वाढणार्‍या किमती या आणि इतर अशा गोष्टी (ज्यावर विचार करुन आपण फक्त वेळ वाया घालवतो) त्यापासुन जरा बाहेर आलेले असतो,
आता ती जी शांतता असते ती ऐकुन आपल्याला स्वाभाविकपणे समाधी अवस्था प्राप्त करुन घेण्याचा मोह होतो. त्यात काही वावगे आणि अनैसर्गिक ही नाही. बरेच लोकाना असे होते. लोक निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर अंतर्मुख वगैरे होतात. आपण शांतपणे बसलेलो असतो. थोड्या वेळाने वार्‍याचाही आवाज आपल्याला खुपायला सुरुवात होते.
त्या वातावरणात माणुस स्वत:ला विसरु पाहतो. पण असे निरीक्षण आहे की जसे आपण शांततेकडे प्रवास करतो तसतसे आतला कोलाहल वाढायला सुरुवात होते. तरी त्यातुनही आपण स्वत:ला दामटुन पुढे रेटु बघतो. बराच विचित्र अनुभव असतो हा. मला डोक्यात काही विचार नको आहेत . आणि आतातर विचार पाठ सोडायला तयार नाहियेत. मधेच काही सरपटणारे , किटकांचे आवाज त्यात अजुन भरच टाकतात . अजुन जागे करतात. आपला जो निसर्गाबरोबर हा संवाद चालु असतो आणि त्यामधे येणारे हे जे व्यत्यय सदृश उदभव असतात तेच कदाचित माणसाला बरेचदा समाधी अवस्थेपासुन परावृत्त करत असावेत. आणि मानवी मनातील षड्रिपू ही त्या किटक बिरादरीचा वारसा सांगणारेच वाटतात. त्यावेळेला संत तुकारामानी सांगितलेल्या "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धिचे कारण " ची तीव्रतेने आठवण होते . त्या षड्रिपुंपासुन मुक्त होण्याचा "एड्रेस" देणारे एखादे "सर्च इंजिन" या "डिजिटल" युगात विकसित होइल तर काय बहार येइल अशी एक रम्य कल्पना करत मी नेहमी तो अपेक्षांचा घाट उतरतो

2 comments:

nspujari said...

mast re..
end aavaDalaa

lekh aajoon moThThaa kihilaa asataas tar ajoon chaangali depth aali asatee
Neverthless, it is short n sweet

Vishal Joshi said...

Sundar lihilyas! Awadala!